Friday, September 28, 2012

वाचाल तर वाचाल

सध्या अगदी नित्य नेमाने पेपर(वर्तमान पत्र) वाचतोय. म्हणजे अगदी मराठि आणि इंग्रजी असे दोन्ही वृत्तपत्र वाचण्याचा प्रयत्न करतोय, आणि मनापासून सांगतोय कि गेल्या काहि दिवसांपासून मला माझ्यातला झालेला फरक अगदी प्रकर्षानं जाणवतोय, आपल्या आजूबाजूला काय चाललय हे आता माहिती व्हायला लागलय. पण सगळ्यात जास्त आश्चर्य वाटतय ते ऑफिसमधल्या माझ्या मित्रांना, कारण एरवी लंच टेबलवरच्या डिस्कशन मध्ये शांत बसणारा मी सध्या चक्क माझी मतं मांडतोय.

आधीपण नियमितपणे वृत्तपत्र वाचले जायचे पण ऊडत ऊडतच. हेडलाईन, सिनेमाच्या जाहिराती आणि राशी भविष्य बस झाला पेपर वाचुन. पण मग हळुहळु स्वतःला वृत्तपत्र डिटेल्डमध्ये वाचण्याची सवय करून घ्यायला लावली आणि माझा त्यातला इंटरेस्ट वाढत गेला. आहो एका दिवसात ह्या जगात किती अफाट घटना घडतात अगदी आश्चर्य वाटलं. म्हणजे मी इतके दिवस ह्या सगळ्यापासून किती अनभिद्न होतो.

एकीकडे आपणच पोसणारे काहि राजकारणी आपल्याच पैशाचा किती गैरवापर करतात. तर दुसरीकडे काहि राजकारणी ह्या सगळ्याला वाचा फोडण्याकरता स्वतःच्या जीवाचा आटापिटा करत असतात. आहो हे फक्त आपल्याच देशापुरत मर्यादित नसून अगदी पुढारलेल्या पाश्चिमात्य देशांत पण हेच चालतं. किती विसंगतींनी भरलेल आहे हे जग. एकीकडे अतिरेकि लोकांना मारण्याकरता नविन नविन अतिरेकि मार्ग शोधत असतात तर दुसरीकडे रेड क्रॉस सारख्या संस्था गांजलेल्या लोकांच्या जखमा भरायचा प्रयत्न करत असतात. कुठे नवनवीन शोध लागत असतात तर कुठे जुन्या अंधश्रध्दांपायी लोक अगदी खालच्या थराला जाऊन पोहोचतात. कुठे पाण्यावाचून दुष्काळ तर कुठे पाण्याविना दुष्काळ. अहो एक ना अनेक अशा विविध बातम्या ह्या पेपरमध्ये सामावलेल्या असतात. आणि तेव्हा एक मात्र पटल वाचाल तर वाचाल.

No comments:

Post a Comment